Friday, July 22, 2011

श्रावणात...


श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशीम धारा
उलगडला झाडांतून अवचित, हिरवा मोरपिसारा ||ध्रु.||

जागुनि ज्याची वाट पाहिली, ते सुख आले दारी 
जिथे तिथे राधेला भेटे, आता श्याम मुरारी 
माझ्याही ओठांवर आले, नाव तुझेच उदारा ||१|| 

रंगांच्या रानात हरवले, ते स्वप्नांचे पक्षी 
निळया रेशमी पाण्यावरती, थेंबबावरी नक्षी 
गतजन्मीची ओळख सांगत, आला गंधित वारा ||२||

पाचूंच्या हिरव्या माहेरी, ऊन हळदीचे आले
माझ्या भाळावर थेंबांचे फुलपाखरु झाले 
मातीच्या गंधाने भरला, गगनाचा गाभारा ||३|| 

पानोपानी शुभशकुनांच्या कोमल ओल्या रेषा 
अशा प्रीतीचा नाद अनाहत, शब्दावाचून भाषा 
अंतयार्मी सूर गवसला, नाही आज किनारा ||४||


गीतकार: मंगेश पाडगांवकर
गायक: लता मंगेशकर
संगीतकार: श्रीनिवास खळे